सर्व पाकिस्तानींची ओळख पटली; सर्वांना देशाबाहेर पाठवणार : मुख्यमंत्री   

मुंबई,(प्रतिनिधी) : केंद्र सरकारने काढलेल्या आदेशात जे पाकिस्तानी बसतात, त्या सर्वांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. ते कशा प्रकारे बाहेर जात आहेत; त्या सगळयाची नोंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. देशाबाहेर गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा निश्चित आकडा पोलिस विभागाकडून जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
महाराष्ट्रात आलेले १०८ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला होता. तर एकही पाकिस्तानी बेपत्ता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने सरकारच्या उच्चपदस्थ लोकांमध्येही समन्वय नसल्याची बाब पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सर्व पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागला असून त्यांची पाठवणी सुरू असल्याचे सांगितले. दीर्घ मुदतीचा व्हिसा, राजनैतिक किंवा अधिकार्‍यांसाठी दिला जाणारा व्हिसा असणार्‍यांना देश सोडून जाण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, अल्पमुदतीच्या व्हिसावरील सर्वाधिक १,००० पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत. तसेच, जवळपास ५,०५० पाकिस्तानी नागरिक दीर्घमुदतीच्या व्हिसावर राज्यात राहात आहेत. 
 
मुंबईतही १७ पाकिस्तानी नागरिक होते. कोणीही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, गायब किंवा हरविलेला नाही. रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविले जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

वडेट्टीवार यांच्यावर खरपूस टीका 

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची वक्तव्ये करून जे मृत्युमुखी पावले त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. मृत्युमुखी पावलेल्यांच्या नातेवाईकांनी स्पष्टपणे या गोष्टी सांगितल्या आहेत. तिथे वडेट्टीवार गेले होते का? अशा प्रकारे नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे योग्य नाही.

ईडी कार्यालयातील एकाही कागदाला धक्का नाही 

मुंबईतील अंमलबजावणी महासंचालनालय (ईडी) कार्यालयाला आग लागली होती. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, मी ईडीच्या अधिकार्‍यांशी बोललो आहे. ईडी कार्यालयातील एकाही कागदाला धक्का लागलेला नाही. सर्व कागदपत्रांच्या मिरर ईमेज म्हणजेच कॉपीज असतातच, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बुलेट ट्रेनचे काम अतिशय वेगाने सुरू असून ते २०२८ पर्यंत पूर्ण होईल. उद्धव ठाकरे सरकारने निर्णय घेऊन हे काम बंद पाडले होते. त्यामुळे आपण अडीच वर्षे मागे गेलो. दरम्यानच्या काळात गुजरातमध्ये काम वेगाने सुरू होते. पण, मागच्या अडीच वर्षांत या कामाने गती घेतल्याचेही फडणवीस म्हणाले. 
 

Related Articles